सावरवाडी (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील हिरवडे दुमाला येथील लोकनियुक्त सरपंचाविरुद्ध ग्रामपंचायतीच्या सर्व ७ सदस्यांनी आणलेल्या अविश्वास ठरावाच्या संदर्भात ग्रामसभेचे मतदान घेण्यात आले. यात अविश्वास ठरावाच्या बाजूने ३४४ तर विरोधात ३७३ मते पडली. २९ मतांनी हा ठराव फेटाळून लावल्याने  पुन्हा सरपंचपदी दत्तात्रय कांबळे यांची निवड करण्यात आली. करवीरचे गटविकास अधिकारी जयवंत उगले यांच्या अध्यक्षतेखाली ही मतदान प्रक्रिया पार पडली. 

हिरवडे दुमाला येथे शिवसेना – शेकाप युतीचे लोकनियुक्त सरपंच व पाच सदस्य तर विरोधी काँग्रेस गटाचे २ सदस्य निवडून आले होते.  मात्र, सरपंच ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेऊन काम करत नसल्याच्या कारणास्तव ९ ऑक्टोबरच्या  विशेष सभेत सर्वपक्षीय सातही सदस्यांनी एकत्र येत सरपंचाविरुद्ध अविश्वास  ठराव पारित केला होता. त्यानंतर सोमवारी (दि.७) झालेल्या ग्रामसभेत अविश्वास ठरावाच्या संदर्भात मतदान घेण्यात आले. यात लोकनियुक्त सरपंच कांबळे यांनाच २९ मतांनी मतदारांनी विजयी केले. त्यामुळे समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत विजय साजरा केला.

सरपंच दत्तात्रय कांबळे यांनी ‘लाईव्ह मराठी’शी संवाद साधला. ते म्हणाले की, आतापर्यंत प्रामाणिकपणे केलेल्या कामाची ही पोहोचपावती आहे. ग्रामस्थांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता काम करत राहणार आहे. माझ्या विजयासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचा आभारी आहे.