हातकणंगले पंचायत समिती सभापतींविरोधात अविश्वास ठराव

0
1309

कोल्हापूर (प्रतिनिधी) : हातकणंगले पंचायत समितीचे सभापती महेश ऊर्फ दरगोंडा बसगोंडा पाटील यांच्याविरूद्ध पंचायत समितीच्या १६ सदस्यांनी  अविश्वास ठराव दाखल केला. हा ठराव जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे मंजुरीसाठी आज (सोमवार) पाठविण्यात आला. सभापती पाटील हे ताराराणी आघाडीचे सदस्य असून त्यांच्याविरूद्ध भाजप ५, जनस्वराज्य ५, शेकाप ३, शिवसेना २ आणि काँग्रेस १ अशा १६ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे.

सभापती पाटील इतर सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत आहेत. पंचायत समितीसाठी येणाऱ्या निधीचा परस्पर वापर करत आहेत. तसेच स्वच्छ भारत अभियानातर्गंत बांधण्यात आलेल्या शौचालय घोटाळ्यात पाटील यांचा सहभाग असल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात १६ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला. पंचायत समितीच्या इतिहासात सभापतीविरोधात अविश्वास ठराव दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे.