कोल्हापूर (प्रतिनिधी) : आर्थिक सक्षमीकरणातून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी केडीसीसी बँक सदैव महिलांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही माजी खासदार आणि ज्येष्ठ संचालक श्रीमती निवेदिता माने यांनी दिली. आज (सोमवार) कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. या वेळी बॅंकेतर्फे जिल्ह्यातील बचत गटांच्या कार्यकर्त्यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.  

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संचालक श्रीमती उदयानीदेवी   साळुंखे म्हणाल्या की, उद्योग उभारणीतून स्वावलंबनासाठी महिला जर दोन पाऊल पुढे आल्या तर बँक त्यांच्या सहकार्यासाठी चार पाऊल पुढे येईल. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए.बी. माने म्हणाले की, बचत गटांच्या मागणीनुसार उद्योग व व्यवसाय उभारणीसाठी अल्प व्याजदरातील कर्ज देण्यास बँक कटिबद्ध आहे.

या वेळी कबनूर येथील जिजामाता महिला बचत गट व संस्कृती महिला बचत गट, तसेच कोल्हापुरातील प्रिन्सेस पद्माराजे महिला बचत गट, पद्माराजे उद्यान महिला बचत गट,  महालक्ष्मी महिला बचत गट, निगवे दुमाला येथील राजलक्ष्मी महिला बचत गट, पारगाव येथील संघर्ष महिला बचत गट या बचत गटांना दप्तर वाटप झाले.

शेती कर्जे विभागाचे उपव्यवस्थापक अजित जाधव यांनी स्वागत, महिला विकास कक्षाच्या उपव्यवस्थापक सौ. रंजना स्वामी यांनी प्रास्ताविक, सौ. गिरीजा पुजारी यांनी सूत्रसंचालन, प्रशासन विभागाचे व्यवस्थापक जी. एम. शिंदे यांनी आभार मानले.