नितीशकुमारच होणार मुख्यमंत्री : सोमवारी शपथविधी   

0
55

पाटणा (वृत्तसंस्था) : जेडीयूचे नेते नितीश कुमार यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) नेतेपदी आज (रविवारी) निवड झाल्याने  तेच पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री होणार असल्याचे निश्चित झाले. नितीशकुमार सोमवारी (दि.१६) सकाळी ११.३० वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सातव्यांदा आणि सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार ते सांभाळतील.

सरकार स्थापन करण्यासंबंधी भाजप, जेडीयू, हिंदुस्तानी आवाम मोर्चा (एचएएम) आणि विकासशील इन्सान पार्टी (व्हीआयपी) यांची नितीश कुमार यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीत नितीशकुमार यांची नेतेपदी निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला.  बिहारमध्ये एनडीएने १२२ जागांसहित स्पष्ट बहुमत मिळवले आहे. भाजपला ७४ जागा मिळाल्या आहेत. तर दुसरीकडे नितीश कुमार यांच्या पक्षाला ४३ जागांवरच विजय मिळवता आला. भाजपच्या जागा मात्र ५३ वरुन ७४ वर पोहोचल्या.  त्यामुळे मुख्यमंत्री नितीशकुमार होणार का ? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. भाजपच्या श्रेष्ठींनीही पुन्हा नितीशकुमारच मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट केले होते. अखेर एनडीएच्या बैठकीत नितीश कुमार यांची नेतेपदी निवड झाल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.