मुंबई (प्रतिनिधी) : नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर  राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये मोठे फेरबदल होण्याचे शक्यता आहे. काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष  नाना पटोले आणि उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची एकत्र भेट घेतल्याने  चर्चेला उधाण आले  आहे.

नाना पटोले यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे. त्यामुळे  काँग्रेसकडील खात्यात फेरबदल होण्याची शक्यता आहे . नाना पटोले आणि नितीन राऊत यांची सोनिया गांधी व राहुल गांधीसोबत झालेल्या बैठकीनंतर नितीन राऊत यांच्याकडे  राज्याचे उपमुख्यमंत्रीपद देण्याची शक्यता आहे. तर, नितीन राऊतांचे उर्जामंत्री पद नाना पटोले यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र, नितीन राऊत उपमुख्यमंत्री झाल्यास त्यांना  कोणते  खाते  देण्यात येईल, याबाबत चर्चा झालेली नाही .  दरम्यान विधानसभेचे अध्यक्षपद कोणाकडे जाणार, याबाबत पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेकडे विधानसभा अध्यक्ष पद जाईल आणि त्या बदल्यात काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद दिले जाईल, अशी  माहिती सूत्रांकडून मिळत  आहे.