भाजप संसदीय समितीतून नितीन गडकरी यांना वगळले

0
26

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजप संसदीय बोर्ड आणि निवडणूक समितीची घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवडणूक समितीचे सदस्य असतील. भाजपच्या संसदीय समितीवर मात्र महाराष्ट्रातील नेत्यांना स्थान देण्यात आलेले नाही. नितीन गडकरी आणि शिवराजसिंह चौहान संसदीय समितीवरून बाहेर करण्यात आले आहेत. याआधी महाराष्ट्रामधून नितीन गडकरी हे संसदीय समितीमध्ये होते; मात्र त्यांना आता या समितीतून बाहेर झाले आहेत.

संसदीय बोर्ड हे भाजपसाठी सर्वोच्च समिती मानली जाते. कारण अत्यंत महत्वाचे निर्णय या संसदीय बोर्डाच्या माध्यमातून घेतले जातात आणि बोर्डाने पुनर्रचना करण्यात आलेली आहे. भाजपचे माजी अध्यक्ष तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आता या समितीमध्ये नसतील. त्यांना समितीतून बाहेर काढण्यात आले आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा देखील या समितीत आता समावेश नसणार आहे. त्यांच्या जागेवर आता कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा आणि आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांना या समितीत स्थान देण्यात आले आहे. के. लक्ष्मण यांना देखील यामध्ये स्थान देण्यात आलेले आहे.

भाजपने एक वेगळ्या पद्धतीची संसदीय रचना केली आहे. या समितीत जे. पी. नड्डा हे अध्यक्ष आहेत. यासोबतच या समितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे.पी. नड्डा, अमित शहा, सर्बानंद सोनोवाल, के. लक्ष्मण, इकबाल सिंह लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जटिया आणि बी.एल. संतोष असे ११ जण या समितीत असणार आहेत. या समितीत देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश होईल, असे मानले जात होते. कारण ते पक्षातील महत्वाचे नेते आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाची देखील या समितीत चर्चा होती; पण त्यांना देखील या समितीत स्थान मिळालेले नाही.

देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्या एका महत्वाच्या समितीत म्हणजेच निवडणूक समितीत त्यांना स्थान देण्यात आलेले आहे. त्या निवडणूक समितीमध्ये देखील खूप महत्त्वाच निर्णय म्हणजे केंद्रीय निवडणूक समितीमध्ये उमेदवारांना तिकीट वाटपाचे निर्णय होतात. त्यामध्ये महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांचे एकमेव नाव दिसत आहे.