श्री. मारुती राणोजी पाटोळे बसर्गे (ता. गडहिंग्लज) परिसरातील एक कर्तव्यनिष्ठ, कमालीचे शिस्तप्रिय शिक्षक. ३३ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते १९९१ मध्ये निवृत्त झाले. १ सप्टेंबर २०२१ रोजी ते वयाच्या नव्वदीत पदार्पण करीत आहे. त्यानिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कष्टमय जीवनप्रवासाचा उहापोह करणारा हा लेख.

त्यांचे नाव जरी मारुती असले तरी बसर्गे परिसर त्यांना पाटोळे गुरुजी नावाने ओळखतात. अल्पभूधारक कुटुंबात जन्म, एकूण ६ भावंडे. वडील राणोजी बाबाजी पाटोळे शिक्षक. वडील शिक्षक असले तरी उत्पन्न सीमित. त्यामुळे लहानपण काटकसरीत गेले. वडिलांची बदलीची नोकरी, वडिलांची जिकडे बदली होईल तिकडे शिक्षण सुरू राहिले, प्रसंगी या शिक्षणात खंड पडत गेला. सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी गडहिंग्लज येथील एम. आर. हायस्कूलमध्ये प्रवेशही झाला. पण प्रवासामुळे शिक्षण सोडले. पुढे तीन वर्ष शेती केली. दरम्यान वडिलांचे मित्र राष्ट्रपती पारितोषिक विजेते गुरुवर्य श्री. बी. ए. चौगुले गुरुजी यांनी व वडिलांनी पुढे शिक्षण घेण्याची उर्मी दिली. आपण शिकून आपल्या वडिलांचा शिक्षकी पेशा पुढे चालवावा, असे गुरुजींना मनोमन वाटले. त्यातून गारगोटी येथील मौनी विद्यापीठात सर्व शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर  वि. मं. हलकर्णी येथे २२ ऑक्टोबर १९५८ रोजी शिक्षक म्हणून रुजू झाले. पुढे बसर्गे व हलकर्णी येथे ३३ वर्षाची सेवा करून ते १९९१ साली निवृत्त झाले.

त्या काळाच्या प्रथेप्रमाणे आईवडिलांच्या पसंतीने नोकरीच्या आधीच विवाह झाला. संसार सुरू झाला. एकत्र कुटुंब. भावडांचे शिक्षण, लग्ने, स्वत: लक्ष घालून करून दिली. पुढे त्यांचे वैयक्तिक कुटुंब वाढू लागल्यावर एक दिवस घरच्यांनी पूर्व कल्पना न देता केवळ अडीच शेर ज्वारी आणि अडीच शेर तांदूळ देऊन घराबाहेर काढले. गुरुजी व त्यांची पत्नी ताराबाई यांनी ७ अपत्यासह शेतातील तात्पुरता निवारा म्हणून उभ्या केलेल्या झोपडीत संसार थाटला. महिन्याकाठी मिळणाऱ्या ६० रुपये पगारात कुटुंब चालेना. दुभत्याचा संसाराला हातभार लागेल, म्हणून एक म्हैस घेतली. सासरच्या मंडळीनी हातभार लावला. तर पत्नी ताराबाईने मोल मजुरी करून   आपला संसार चालविला. या विषयीच्या आठवणी जागवताना ते म्हणतात आयुष्यात संकटे साऱ्यांच्याच वाट्याला येतात. पण जेथे संकट आहे, तिथे संधीही आहे. ती संधी आपण शोधायला हवी. ती शोधली तर आपण माणूस म्हणून मोठे होत जातो.

शिक्षक झाल्यानंतर राष्ट्रपती पारितोषिक विजेते आदरणीय गुरुवर्य श्री. बी. ए. चौगुले गुरुजी व राज्यपाल पारितोषिक विजेते श्री. सी. व्ही. हंचनाळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची शिक्षक म्हणून उत्तम घडवणूक होत गेली. पेशावरची निष्ठा वाढत गेली. या दोन आदरणीय गुरुवर्याचे संस्कारांनी मला मोठे केल्याचे ते आवर्जून सांगतात. पुढे गुरुजीच्या पावलावर पाऊल ठेऊन पुढे लहान बंधू वसंतराव, बहीण आक्काताई हे शिक्षक झाले. दुसरे बंधू जयराम वकील झाले. मोठा मुलगा बबन डे. इंजिनिअर म्हणून शासकीय नोकरीतून निवृत्त झाला. लहान मुलगा दिनकर एमबीए करून व्यवसायिक झाला.

शिक्षक, शेतकरी, व्यावसायिक, कलावंत, नोकरदार असे सर्व पेशातील यशस्वी घोडदौड करणारे जावई, डॉक्टर, वकील पेशातील पुतणे, इंजिनिअर, व्यावसायिक झालेले नातवंडे पाहता आपल्या कुटुंबात शिक्षणाचा वटवृक्ष झाला. सर्वच विद्याशाखेची फळे आपल्या फांदीला लागल्याची कृतज्ञता आहेच. या शाखांचा आणखी विस्तार व्हावा. ही त्यांची इच्छा. आपल्या किती आयुष्य मिळाले या पेक्षा आपण आजवर स्वाभिमानाने जगलो, याचा आनंद मोठा आहे. ३३ वर्षाच्या नोकरीत मेडिकल, इंजिनिअर, सैन्यदलाचे नेतृत्व करणारे अनेक विद्यार्थी घडविल्याचे समाधान असल्याचे अभिमानाने सांगतात.

व्यक्ती म्हणून तुमचे असे काही कर्तृत्व असायला हवे. हेच सूत्र ठेवून त्यांनी आपल्या हजरजबाबी स्वभावाने मुली, नातींच्या विवाहापासून प्रेम, परिचय की अॅरेज मॅरेज या गोंधळात सापडलेल्या आताच्या पिढीपर्यंत परिसरातील अनेकांचे विवाह जमवून ते यशस्वी करून दाखवले आहेत. ते करत असताना त्यांनी सोयरिकीत मुलाची स्थावर जंगम मालमत्ता पाहता व्यक्तीच्या कर्तृत्वाला, चारित्र्याला प्राधान्य दिले. आजही गावातून फेरफटका मारताना नमस्कारासाठी जोडले जाणारे हात, पाटोळे गुरुजी म्हणून गावकार्यात मिळणार मान हा शासनाच्या निवृत्ती वेतनापेक्षा त्यांना मोठा वाटतो.

नव्वदीतही उत्तम आरोग्य असणाऱ्या गुरुजीच्या आरोग्याचे रहस्य म्हणजे घरचे ताजे अन्न, जेवणात साध्या जेवणाचा आग्रह, व्यसनापासून अलिप्तता, दूधदुभते, पुरेशी विश्रांती आणि पदोपदी काळजी घेणारी त्यांची पत्नी ताराबाई. याच्या जोडीला सतत सभोवती असणारा माणसांचा वावर. यामुळे आपणाला आरोग्य संपन्न प्रवास झाला. हाती मुबलक पैसा असून त्याची उधळपट्टी न करता माफक गरजा ठेवून ते आजवर जगत आले, म्हणूनच ते आनंदी राहू शकल्याचे ते आवर्जून सांगतात.

बळवंत मगदूम (9822446292)