कोल्हापूर (प्रतिनिधी) : जमिनीच्या वादातून मारहाण केल्याप्रकरणी पन्हाळा तालुक्यातील बच्चे सावर्डे येथील ९ जणांना दहा वर्षांच्या सश्रम कारावास, प्रत्येकी १६ हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी सुनावली. तुकाराम सखाराम बाऊचकर, गुंगा सखाराम बाऊचकर, विलास सखाराम बाऊचकर, युवराज सखाराम बाऊचकर, विजय विलास बाऊचकर, गणेश विलास बाऊचकर, अविनाश गुंगा बाऊचकर, दिपक युवराज बाऊचकर, निलेश युवराज बाऊचकर अशी त्यांची नावे असून हा प्रकार २०१२ साली घडला होता. याबाबत रंगराव बाऊचकर यांनी फिर्याद दिली होती. 

बच्चे सावर्डे येथील बाऊचकर परिवारातील फिर्यादी रंगराव बाऊचकर व आरोपी हे नात्याने चुलतभाऊ व चुलत पुतणे असून त्यांच्यामध्ये जमिनीच्या हद्दीवरून वाद होता. १६ नोव्हेंबर २०१२ रोजी फिर्यादी गावातील डेअरीमध्ये दूध घालण्यासाठी गेला असता याच रागातून फिर्यादीला तुझ्या मनानेच हद्द ठरवतोस काय असे म्हणत ९ आरोपींनी संगनमताने काठ्या, तलवार, कोयत्याद्वारे जबर मारहाण केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्यामुळे फिर्यादीने कोडोली पोलीस ठाण्यात या आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. तपास अधिकारी जे. बी. सूर्यवंशी यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

या कामी एकूण अकरा साक्षीदार तपासण्यात आले. यामधील साक्षीदारांच्या साक्षी, सरकारी वकील अमित महाडेश्वर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी या ९ आरोपींना दहा वर्षांच्या सश्रम कारावासासह प्रत्येकी १६ हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली.