म्हैसाळ येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांची आत्महत्या

0
818

सांगली (प्रतिनिधी) : मिरजपासून १२ किलोमीटरवर असणाऱ्या म्हैसाळ येथील एकाच कुटुंबातील नऊ जणांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर मिरजमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, आर्थिक विवंचनेतून या सर्वांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

म्हैसाळ येथे एका डॉक्टर दाम्पत्याच्या घरातील एकाच वेळी नऊ जणांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. डॉक्टर दाम्पत्याच्या घरात सहा मृतदेह, तर दुसऱ्या घरात तीन मृतदेह आढळून आले आहेत. या सामूहिक आत्महत्येचा घटनेने संपूर्ण मिरज तालुका हादरून गेला आहे. या कुटुंबाने कर्जबाजारीपणातून सामूहिक आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

माणिक यल्लाप्पा वनमोरे (डॉक्टर), आक्काताई वनमोरे (आई), रेखा माणिक वनमोरे (बायको), प्रतिमा वनमोरे (मुलगी), आदित्य वनमोरे (मुलगा), पोपट यल्लाप्पा वनमोरे (शिक्षक), संगीता  वनमोरे (पत्नी), अर्चना वनमोरे (मुलगी), शुभम वनमोरे (मुलगा) अशी या घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

दरम्यान, या सर्वांचा मृत्यू हा विषबाधेने झाला की त्यांनी आत्महत्या केली, हे मात्र समजू शकले नाही. म्हैसाळ येथे पशुवैद्यकीय डॉक्टर कुटुंबासहित वास्तव्यास आहेत. सोमवारी सकाळी उशिरापर्यंत त्यांच्या घराचा दरवाजा उघडला नव्हता. त्यामुळे दवाखान्यातील कर्मचारी तसेच आजूबाजूला राहणाऱ्या ग्रामस्थांनी त्यांना मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.