नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्ञानवापी मशिदीप्रकरणी पुढील सुनावणी २२ सप्टेंबरला होणार आहे. आज वाराणसी जिल्हा न्यायालयात याबाबत सुनावणी पार पडली. हिंदू पक्षाच्या बाजूने न्यायालायने निर्णय घेतला असून, हे प्रकरण सुनावणी योग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी सुनावणी होऊ नये याकरिता मुस्लिम पक्षाने याचिका केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

वाराणसीतील ज्ञानवापी मशीद परिसरातील माँ श्रृंगार गौरीचे नियमित दर्शन आणि पूजेच्या मागणीसाठी हिंदू समाजाच्या बाजूने याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेविरोधात मुस्लिम पक्षाने खटला फेटाळण्यासाठी याचिका केली होती. यासाठी त्यांनी पुरावे सादर केले होते; मात्र वाराणसी जिल्हा न्यायालयाने मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळून लावली आहे.

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान शहरात कलम १४४ लागू करण्यात आले होते. वाराणसीतील ज्या भागात हिंदू- मुस्लीम समाज राहतो त्या भागात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. या प्रकरणी आता २२ सप्टेंबरला सुनावणी होणार असल्याने हिंदू समाजात आनंद व्यक्त करण्यात येत आहे. हिंदू समाजाच्या बाजूनेच पुढील निकाल लागेल, अशी आशाही व्यक्त करण्यात येत आहे.