मलकापूर येथील वृत्तवाहिनीचे कॅमेरामन प्रमोद सौंदडे यांचे निधन

0
236

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मलकापूर (ता. शाहूवाडी) येथील वृत्तवाहिनीचे कॅमेरामन प्रमोद तातोबा सौंदडे (वय ३४)  यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन लहान मुले व एक मोठा भाऊ असा परिवार आहे.

१२ वर्षांपूर्वी प्रमोद यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीतून कॅमेरामन म्हणून कामाला सुरुवात केली. त्यानंतर आयबीएन-लोकमत या वृत्तवाहिनीचा कॅमेरामन म्हणून ते रुजू झाले होते.  इलेक्ट्रॉनिक माध्यम हे कॅमेराशिवाय घडलेल्या घटनेची बातमी बोलकी होत नसते, शिवाय घटनेची तीव्रता लोकांसमोर येत नाही.  प्रमोद यांच्याकडे घडलेली घटना आणि त्याचे व्हिडिओ चित्रण कल्पकतेने टिपण्याचे कौशल्य होते. त्यांनी अनेक घटनांची दृश्ये चांगल्या पद्धतीने कॅमेराबद्ध करून समाजासमोर आणली होती.

या कामगिरीमुळेच त्यांना कोल्हापूर प्रेस क्लबने उत्कृष्ट कॅमेरामन या पुरस्काराने सलग दोनदा गौरवले होते.  त्यांचा स्वभाव मनमिळावू होता. त्यांच्या अकाली एक्झिटमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. माध्यम क्षेत्रामध्ये त्यांच्या निधनामुळे  हळहळ व्यक्त होत आहे.