कळे  (प्रतिनिधी) : नवयुवकांना व नवकवींना प्रेरणादायी नवचेतना युक्त दर्जेदार काव्य निर्मितीसाठी महाराष्ट्र मराठी साहित्य महासभेच्या  माध्यमातून प्रेरित केले आहे, असे प्रतिपादन  गझलकार डॉ. दयानंद काळे यांनी केले. ते भगतसिंग तरूण मंडळ, सावर्डे तर्फ असंडोली (ता.पन्हाळा) येथे जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून व मराठी साहित्य महासभा या संस्थेच्या उद्‌घाटनप्रसंगी बोलत होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष कवी रामहरी वरकले यांनी केले. प्रास्ताविक व स्वागत  कवी दीपक नागवंशी, तर सूत्रसंचालन प्रेम कवी परशुराम कांबळे यांनी केले. आदिवासींचे जननायक बिरसा मुंडा व राघोजी भांगरे या महान क्रांतिकारक विषयी कवी सुरेश वडर, रामहरी वरकले, परशुराम कांबळे, विनोद पोवार, धोंडीराम भोसले, विक्रम राजवर्धन, सागर कांबळे, संभाजी चौगले यांनी नवयुवकांना स्फूर्तिदायक काव्य रचना सादर केल्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कवी संभाजी चौगले होते. आभार सुरेश वडर यांनी मानले.

या कार्यक्रमास पश्चिम पन्हाळा पत्रकार संघाचे ज्येष्ठ पत्रकार पी. व्ही. पाटील, माजी अध्यक्ष सरदार काळे, कुंभी साखर कारखान्याचे संचालक आबा पाटील,  संघर्ष बहुजन सेनेचे राज्य सचिव रमेश कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष सात्ताप्पा पोवार, सरपंच भाग्यश्री बच्चे, अरुण पोवार यासह आदी उपस्थित होते.