इचलकरंजी (प्रतिनिधी) : शहरातील विना तपासणी चिकन व मटण विक्री करणा-यांवर कारवाई करावी, अन्यथा किंक्रांतीदिवशी रक्तीमुंडी आंदोलन छेडणार, असा इशारा नवीन युवक सेनेच्या वतीने देण्यात आला. याबाबतचे निवेदन आज (बुधवार) इचलकरंजी पालिकेत नगराध्यक्ष सौ. अलका स्वामी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला. या वेळी नूतन पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे उपस्थित होते.

इचलकरंजी शहरात काही ठिकाणी विना तपासणी चिकन व मटण विक्री होत असताना देखील नगरपालिका प्रशासनाकडून संबंधित विक्रेत्यांवर कोणतीच कारवाई होत नसल्याचा आरोप या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. तसेच शासकीय परवाना नसताना देखील चिकन व मटणची विक्री करण्याबरोबरच मांस, कचरा सार्वजनिक गटारीत टाकण्याचा प्रकार राजरोस घडत आहे. त्यामुळे बर्ड फ्लू आजाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून पक्षी व बकऱ्यांची तपासणी करुन त्याबाबतचे प्रमाणपत्र देऊनच त्याची विक्री दुकानदारांनी करावी. तसेच त्याचे उल्लंघन करणा-यांवर पालिका प्रशासनाने कडक कारवाई करावी, अन्यथा किंक्रांतीदिवशी नगरपालिका इमारत किंवा प्रांत कार्यालय आवारात रक्ती मुंडी आंदोलन छेडण्याचा इशारा या वेळी नगराध्यक्षांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला.

यावेळी नगराध्यक्षांनी या मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही करू, असे शिष्टमंडळाला आश्वासन दिले. यावेळी नवीन युवक सेनेचे संतोष कांदेकर, अतुल नवनाळे, मुन्ना मोमीन, योगेश चव्हाण, अनिल भुते, सद्दाम मोमीन, मनोहर कांबळे, जगदीश कांबळे, रमेश पाटील, सुनील माने, प्रथमेश माने, दादासाहेब आदी उपस्थित होते.