कोजीमाशि पतसंस्थेची सभासदांना नववर्षाची  भेट…

0
182

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोजीमाशीच्या झालेल्या संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये सभासदांना नवीन वर्षाची भेट म्हणून १ जानेवारीपासून नियमित कर्ज व्याजदर साडे अकरा टक्क्यावरून ११ टक्के करण्यात आला आहे. तर आकस्मिक कर्ज मर्यादा एक लाख रुपये करत त्यांचा व्याजदर दहा टक्के केला आहे. त्याचबरोबर कर्ज कपात साडेपाच टक्क्यावरून साडेतीन टक्के इतकी केली आहे.

कोजीमाशी पतसंस्थेने कायमस्वरूपी सभासदांचे हीत लक्षात घेऊन व्याजदर कमी करत संस्थाही सभासद हितासाठीच आहे याची खात्री दिली आहे. या संस्थेने एक एप्रिल २०२० पासून आजअखेर सभासदांचे कर्ज १ कोटी २५ लाख माफ केले आहे. तसेच कोरोनाबाधीत सभासदांना आर्थिक मदत देण्याचाही संकल्प संचालक मंडळाने केला आहे. त्यामध्ये दिनांक नोव्हेंबर २०२० च्या अखेरच्या कोरोनाबाधित सभासदांना संस्थेमार्फत प्रत्येकी पाच हजारांची मदत देण्याचा ठराव  मंजूर करण्यात आला.

संपूर्ण महाराष्ट्रात अग्रगण्य असलेल्या या संस्थेचा कारभार शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या नेतृत्वाखाली चालला आहे. लॉकडाऊनच्या काळातही या संस्थेने ४५० कोटींचा टप्पा पार केला आहे. गत आर्थिक वर्षांत संस्थेने चार कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवत सभासदांना २२ टक्के लाभांश आणि दहा लिटर सूर्यफूल तेल दिवाळी भेट म्हणून दिली आहे अशी माहिती तज्ज्ञ संचालक दादासाहेब लाड, चेअरमन कैलास सुतार, व्हा. चेअरमन सुभाष पाटील यांनी दिली.

शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी आघाडीची सत्ता जानेवारी २००४ मध्ये आली. यावेळी संस्थेच्या ३२ कोटी ठेवी होत्या. अवघ्या सोळा वर्षांत संस्थेने ४५० कोटींचा टप्पा पार केला आहे. दरवर्षी टप्प्याटप्प्याने कर्ज व्याजदर कमी करत १७ टक्के वरून तो ११ टक्क्यापर्यंत आणला आहे. कोणत्याही विमा कंपनीच्या सहकार्याशिवाय मयत सभासदांचे कर्ज माफ करणारी कोजिमाशि ही महाराष्ट्रातील पहिली संस्था आहे.

नुकत्याच झालेल्या पुणे विभाग शिक्षक विधान परिषदेच्या निवडणुकीतून कोल्हापूरचा आमदार व्हावा आणि पालकमंत्री सतेज पाटील यांचा शब्द राखत  दादासाहेब लाड यांनी माघार घेतली होती. येत्या कोजिमाशि निवडणूकीमध्ये सभासदांचे पाठवबळावर चौथ्यांदा साभिमानी आघाडीचे पॅनेल लाड यांच्या नेतृत्वाखाली सामोरे जाणार आहे. तसेच संस्थेच्या प्रगतीमुळे लाड यांना विजयाची खात्री व्यक्त केली आहे.