कागल (प्रतिनिधी) : छ. शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत दि. १५ रोजी कागल येथे ऊस पिकांवर ड्रोन तंत्राद्वारे औषध फवारणीचे प्रात्यक्षिक घेण्यात येणार आहे. अशी घोषणा कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांनी घोषणा केली.

सुहासिनीदेवी घाटगे म्हणाल्या की, माजी चेअरमन समरजितसिंह घाटगे यांनी व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या माध्यमातून कारखान्यात नेहमीच नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे. ड्रोनद्वारे औषध फवारणी या आधुनिक तंत्रज्ञानाने ऊसाचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठीचा हा  एक वेगळा प्रयोग आहे. शाहू साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना याची माहिती आणि फायदा व्हावा. यासाठी त्याचे प्रात्यक्षिक घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

इस्लामपूर येथील चातक इनोवेशन कंपनीच्या साह्याने हे प्रात्यक्षिक घेण्यात येणार आहे. या ड्रोन तंत्रामुळे आठ मिनिटात एक एकर ऊस पिकाची फवारणी पूर्ण होते. वेळ, श्रम, खर्च, औषधे यांची बचत तर होतेच शिवाय सुरक्षितपणे फवारणी केली जाते. विद्राव्य खते, जिवाणू, कीटकनाशके, ऊस पीक वाढीसाठी आवश्यक संप्रेरके यांची फवारणी करता येते. त्यामुळे आधुनिक पद्धतीच्या ऊस पीक पद्धतीमध्ये उपयुक्त असलेल्या या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक  शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

यावेळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे, कर्नाटकचे माजी उर्जा राज्यमंत्री आणि ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील, सर्व संचालक, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.