पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला नवे वळण :  धक्कादायक ऑडिओ क्लिप्स व्हायरल

0
259

पुणे  (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील परळी येथील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाशी संबंधित काही ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. यात दोन व्यक्तींच्या संभाषणात ‘ती आत्महत्या करणार आहे’ असा उल्लेख ऐकायला मिळत आहे,  तर दुसरी क्लिप आत्महत्या केल्यानंतरची असल्याचा दावा केला जात आहे.  त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे.  

२२ वर्षीय पूजा चव्हाण शिक्षणासाठी पुण्यातील महमंदवाडी परिसरातील हेवन पार्क सोसायटीमध्ये राहात होती. याच सोसायटीत तिने आत्महत्या केली आहे. त्यानंतर   महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्यासोबत तिचे प्रेमसंबंध होते आणि याच संबंधातून तिने आत्महत्या केल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, या प्रकरणात मुलीच्या घरच्यांनी तक्रार दाखल न केल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

दरम्यान,  व्हायरल  झालेल्या क्लिपमध्ये अरुण नावाच्या कार्यकर्त्याचे आणि संबधित मंत्र्याचे संभाषण आहे. हा कार्यकर्ता मृत तरूणीच्या जवळ उभा होता. तेव्हा संबधित मंत्र्याने तिचा मोबाईल ताब्यात घेण्याचे आदेश दिल्याचे क्लिपमध्ये ऐकायला येत आहे. त्यामुळे  या प्रकरणाचे गूढ वाढले असून तपास कऱण्याची मागणी भाजप नेत्या पंकजा मुंढे यांनी केली आहे.