नव्या कोरोनाच्या संसर्गाने ब्रिटनमध्ये पुन्हा लॉकडाउन..!

अनेक देशांनी विमान वाहतूक केली रद्द

0
503

लंडन (वृत्तसंस्था) : ब्रिटनमध्ये करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, नव्या प्रकाराच्या कोरोना  विषाणूने ब्रिटनमधील परिस्थिती आणखी चिघळली आहे. करोनाचा संसर्ग नियंत्रणाबाहेर गेल्याची कबुली आरोग्य मंत्री मॅट हँकॉक यांनी दिली. ब्रिटनमध्ये नव्या विषाणूंचा संसर्ग झालेल्या बाधितांची संख्या वाढल्यामुळे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लंडन आणि दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये लॉकडाउनची घोषणा केली. तर अनेक देशांनी ब्रिटनशी होणारी हवाई वाहतूक बंद केली आहे.

‘बीबीसी’च्या एका कार्यक्रमात आरोग्य मंत्री मॅट हँकॉक यांना करोना नियंत्रणात आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. करोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर असल्याची कबुली त्यांनी दिली. त्याशिवाय ब्रिटनमधील परिस्थिती कठीण आहे. नाताळात सर्वोत्तम भेट द्यायची असेल तर लोकांनी स्वत: घरी थांबावे आणि करोनाला अटकाव करावा असे आवाहन त्यांनी केले.

ब्रिटनमध्ये आढळलेला नव्या प्रकारचा करोना विषाणू हा आधीच्या विषाणूपेक्षा ७० टक्के अधिक वेगाने फैलावतो. लंडन आणि दक्षिण इंग्लंडच्या भागात हा विषाणू वेगाने फैलावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बाधितांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे रविवारपासून कठोर नियमांसह लॉकडाउन सुरू करण्यात आला. त्यामुळे लाखो नागरिकांवर पुन्हा एकदा घरातच थांबवण्याची वेळ आली आहे.

इंग्लंडचे मुख्य चिकित्सा अधिकारी प्रा. क्रिस विट्टी यांनी सांगितले की, आम्ही जागतिक आरोग्य संघटनेला याबाबत सूचना दिली आहे. त्याशिवाय उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे करोना विषाणूच्या या नव्या प्रकाराचा अभ्यास सुरू आहे. करोना विषाणू हा प्रकार अधिक घातक आहे, याबाबत कोणताही सबळ पुरावा अद्याप समोर आला नसल्याचेही त्यांनी सांगितले.