कोल्हापूर (प्रतिनिधी) : एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण नियमावलीमुळे राज्याच्या विकासावर व बांधकाम व्यवसायावर दुरगामी परिणाम होईल. तसेच सर्वसामान्यांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्यास व घराच्या किंमती नियंत्रणात राहण्यास मदत होणार आहे. तसेच  मरगळ दूर होऊन या व्यवसायाला चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.  

बांधकाम क्षेत्रासाठी एकात्मिक  सर्वसमावेशक विकास नियंत्रण नियमावली मंजूर केल्याबद्दल  क्रिडाई महाराष्ट्र व क्रिडाई एमसीएचआय यांच्या  संयुक्त विद्यमाने  मंत्री एकनाथ शिंदे व नगरविकास विभागाचे अधिकारी यांचा ऑनलाईन वेबिनारद्वारे  सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

क्रिडाईने सामाजिक बांधिलकी जपत कोवीड कालावधीमध्ये हॉस्पीटल उभारणीसाठी संपूर्ण राज्यभर केलेल्या मदतीचा व निसर्ग वादळात कोकण किनारपट्टीमध्ये केलेल्या कार्याचा खास उल्लेख शिंदे यांनी आपल्या भाषणामध्ये केला.

यावेळी नगरविकास राज्यमंत्री  प्राजक्त तनपुरे, नगरविकास प्रधान सचिव भूषण गगरानी,  नगररचना संचालक सुधाकर नांननुरे, नगररचना सहसंचालक प्रकाश भुक्ते, अविनाश पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी क्रिडाई महाराष्ट्रचे राज्याध्यक्ष राजीव परीख, क्रिडाई राष्ट्रीय अध्यक्ष सतिश मगर, क्रिडाई एमसीएचआयचे अध्यक्ष दीपक गोराडीया, राष्ट्रीय उपाध्यक्ष शांतीलाल कटारीया, पुणे शहर अध्यक्ष सुहास मर्चंट आदी उपस्थित होते. या वेबिनारमध्ये राज्यभरातील सुमारे ६०० बांधकाम व्यावसायिक आणि वास्तूविशारद सहभागी झाले होते.