नवी दिल्ली : भारताचा तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्राला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान दुखापत झाली आहे. त्यामुळे तो बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर पडला आहे. दुखापत झाल्याने तो या स्पर्धेत खेळू शकणार नसल्याची माहिती भारतीय ऑलिम्पिक संघटनेने दिली आहे. रविवारी ओरेगॉन येथे पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत नीरजने ८८.१३ मीटर अंतरावर भालाफेक करून रौप्यपदक जिंकलं होतं. या स्पर्धेतील कामगिरीदरम्यान त्याला दुखापत झाल्याने तो राष्ट्रकुल स्पर्धेत खेळू शकणार नाही.

जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपदक स्पर्धेत ८८.१३ मीटर भालाफेक करून रौप्यपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राकडून येत्या २८ जुलैपासून सुरू होणाऱ्या बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाचा दावेदार होता. मात्र जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपदक स्पर्धेत त्याला अंतिम फेरीवेळी दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. त्यामुळे तो राष्ट्रकुल स्पर्धेत खेळणार नसल्याची माहिती भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव राजीव मेहता यांनी दिली.

जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत चौथ्या प्रयत्नावेळी नीरज चोप्राच्या मांडीचा स्नायू दुखावला होता. त्याने स्पर्धा पूर्ण करता यावी यासाठी मांडीला बँडेज बांधून भाला फेकला होता. अशा परिस्थितीही नीरजने ८८.१३ मीटर भालाफेक करत रौप्यपदकाची कमाई केली. पदक जिंकल्यानंतर त्याने आपल्या दुखापतीबाबत सांगितले. आता राष्ट्रकुल स्पर्धेतून नीरजने माघार घेतल्यानंतर त्याची दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याचे सिद्ध झाले.

नीरज चोप्राने यंदाच्या हंगामात ९० मीटर मार्क पार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याने याच वर्षी स्टोकहोम डायमंड लीग २०२२ मध्ये आपलाच राष्ट्रीय विक्रम मोडला. त्याने ८९.९४ मीटर भाला फेकला होता. त्यामुळे या हंगामात तो ९० मीटर मार्क पार करणार अशी आशा होती. मात्र दुखापतीमुळे नीरज चोप्रा बॅकफूटवर गेला आहे.