फिनलँड (वृत्तसंस्था) : येथे झालेल्या नुरमी गेम्समध्ये ऑलिम्पिकवीर नीरज चोप्राने ८९.३० मीटर अंतरापर्यंत भालाफेक केली. नीरजची ही कामगिरी ऑलिम्पिकमधील कामगिरीपेक्षाही सरस ठरली. मात्र, नीरजला या स्पर्धेत सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. 

नीरज चोप्रा हा फिनलँडमधील वर्ल्ड अथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूरमध्ये सहभागी झाला होता. जागतिक पातळीवर डायमंड लीगनंतरची ही प्रतिष्ठेची स्पर्धा समजली जाते. नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक क्रीडा प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घालून इतिहास रचला होता. पुन्हा एकदा धमाकेदार कामगिरी करताना नीरज चोप्राने आपलाच राष्ट्रीय विक्रम मोडला आहे.

ऑलिम्पिकनंतर जवळपास १०  महिन्यानंतर नीरज चोप्रा एका स्पर्धेत सहभागी झाला. ही त्याची पहिलीच स्पर्धा होती. आपल्या पहिल्या प्रयत्नात त्याने ८६.९२ मीटर थ्रो केला. दुसऱ्या प्रयत्नात त्याने ८९.३० मीटर थ्रो केला. त्यानंतर तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या प्रयत्नात त्याने जोरदार प्रयत्न केले. मात्र, या प्रयत्नात ८५.८५ मीटर इतकाच थ्रो फेकता आला.

फिनलँडमधील स्पर्धेत २५  वर्षीय ऑलिव्हर हेलँडर या फिनलँडच्या खेळाडूने सुवर्णपदक जिंकले. त्याने ८९.८३ मीटर भाला फेक करत सुवर्णपदकावर नाव कोरले. या सर्वोत्तम कामगिरीशिवाय, त्याने ८८.०२ मीटर आणि ८०.३६ मीटर अशी कामगिरी नोंदवली.

चोप्राचा यापूर्वीचा राष्ट्रीय विक्रम ८८.०७ मीटर होता. हा विक्रम त्याने मागील वर्षी  मार्चमध्ये पटियाला येथे नोंदवला होता. त्याने ७ ऑगस्ट २०२१ रोजी टोकियो ऑलिम्पिकमध्ये ८७.५८ मीटर भालाफेक करत सुवर्णपदक जिंकले. फिनलँडमधील स्पर्धेतील कामगिरीमुळे नीरजचा आत्मविश्वास दुणावला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड अथलेटिक्स चॅम्पियनशिप आणि राष्ट्रकुल स्पर्धेत त्याच्याकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा केली जात आहे.