पुणे (प्रतिनिधी): विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांना पुण्याचे प्रश्न सोडवण्यापासून कुणी अडवले नव्हते, असा टोला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

विधिमंडळ अधिवेशनात पुण्याचे प्रश्न मांडले न गेल्यावरून नीलम गोऱ्हे यांनी जोरदार टीका केली होती. पुण्याचे प्रश्न न मांडले गेल्याने अनेक प्रश्न प्रलंबित राहिल्याचा आरोप करत पुण्याला कुणीच वाली राहिला नसल्याचा टोला पुण्यातील भाजप आमदारांना लगावला. यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर देताना नीलम गोऱ्हे यांना पुण्याचे प्रश्न सोडवण्यापासून कुणी अडवले नव्हते, असे म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, एकतर नीलम गोऱ्हे उपसभापती म्हणून स्वतःचे अधिक अधिकार वापरतात. ते त्यांनी पुण्यासाठी वापरायला अडचण नव्हती. खरंतर उपसभापतींनी सर्वांचे ऐकायचे असते; परंतु सदस्यांपेक्षा त्याच जास्त बोलतात. सभापतींनी पक्षाचा प्रवक्ता बनायचे नसते, तर या पक्षाच्या प्रवक्ता बनतात.