कोल्हापूर (प्रतिनिधी) : देशाला आज अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांची फार मोठी गरज आहे. यासाठी अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा जागर घातला पाहिजे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केले. ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 296 व्या जयंती दिनानिमित्त कोल्हापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बोलत होते. महाराष्ट्र प्रदेश भटक्या विमुक्त जाती-जमाती सेलचे सरचिटणीस सुनील भोसले, कार्याध्यक्ष अनिल साळोखे, सहकार सेल जिल्हाअध्यक्ष शिरीष देसाई, सेवादल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांची या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.

यावेळी  ए. वाय. पाटील म्हणाले की,  देशात जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती पाहता देशाला पुण्यश्लोक लोकमाता-राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांची गरज आहे. अहिल्यादेवी होळकर यांचे कर्तव्य आज प्रत्येकाने आपल्या अंगी घेऊन आपली जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडले पाहिजे. अहिल्यादेवी होळकर यांचा प्रजाहितदक्ष राज्यकारभार सर्व राज्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आणि दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच भटक्या विमुक्त जाती-जमाती सेलच्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा कार्यअध्यक्षपदी सचिन जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी संतोष जाधव, गणेश पवार, हरिभाऊ काळे, अर्जुन जाधव, मंजुनाथ माने, मच्छिंद्र बनसोडे, विकास घागरे, संभाजी पाटील, संभाजी हराळे आदी उपस्थित होते