इचलकरंजी (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गॅस सिलिंडरची दरवाढ कमी करावी या मागणीसाठी आज (सोमवार) इचलकरंजीतील के. एल. मलाबादे चौकात चूल पेटवून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. या वेळी रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले. यानंतर प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

गँस सिलिंडरसह पेट्रोल, डिझेलचे दर देखील वाढून महागाई गगनाला भिडली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाविरोधात आवाज उठवून त्यांना न्याय मिळावा अशी मागणी करीत राष्ट्रवादी काँग्रेसने चूल पेटवून रास्ता रोको केला. त्यामुळे काही काळ सर्व वाहतूक ठप्प झाली होती. तत्पूर्वी, आंदोलनस्थळी माजी आमदार राजीव आवळे, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे, नगरसेवक विठ्ठल चोपडे यांच्यासह प्रमुख नेतेमंडळींनी केंद्रातील मोदी सरकारवर खरमरीत टीका केली.

या आंदोलनात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रकाश पाटील, पालिकेचे बांधकाम समिती सभापती उदयसिंह पाटील, नगरसेवक अब्राहम आवळे, बाळासाहेब देशमुख, डी. बी. पिष्टे, अभिजीत रवंदे, संतोष शेळके, सचिन भुते, दत्ता देढे, मंगेश कांबुरे, संजय बेडक्याळे, माधुरी चव्हाण, क्रांती आवळे, स्मिता आवळे, मंगल पाटील, यासिन मुजावर, संकेत बागल, विकास पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.