सत्तेत आल्यापासून राष्ट्रवादीची चांदी : भाजप आमदाराच्या कंपनीकडून मोठी देणगी

0
269

मुंबई  (प्रतिनिधी) : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार विराजमान  झाल्यानंतर  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिजोरीत निधीचा ओघ वाढू लागला आहे. पक्षाला मिळालेल्या देणगीमध्ये ५ पटीने वाढ झाली आहे. विशेष म्हणजे देणगीदारांमध्ये भाजप आमदाराचेही नांव समोर आल्याने चर्चांना उधाण आले आहे. २०१९- २०२०  या आर्थिक वर्षात मिळालेल्या देणगीची माहिती राष्ट्रवादीने जाहीर केली आहे.

या वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तब्बल ५९.९४ कोटी रूपये देणगी मिळाली आहे.  मागील वर्षी १२.०५  कोटी रूपये  देणगी मिळाली होती. देणगीमध्ये वाढ झाल्याने राष्ट्रवादीची चांदी झाल्याचे बोलले जात  आहे. भाजपचे  मुंबईचे प्रमुख आणि आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या मालकीच्या लोढा डेव्हलपर्स या कंपनीने ५ कोटी रूपयांची देणगी राष्ट्रवादीला दिली आहे. त्यामुळे  चर्चांना उधाण आले आहे.

याबाबत मंगल प्रभात लोढा यांना छेडले  असता ते म्हणाले की, कंपनी माझ्या मालकीची आहे. पण मी प्रत्यक्षरित्या ती सांभाळत नाही. कंपनीच्या कार्यालयाकडून याबाबत माहिती मागविण्यात आली आहे. परंतु यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना सुरूवात झाली  आहे.