शरद पवार यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवू… : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतली शपथ

0
115

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचा शनिवार (दि. १२) रोजी वाढदिवस साजरा होत आहे. या निमित्त आज (शुक्रवार) कोल्हापूर दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सायबर चौकात पवार यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी योगदान देण्याचा शपथविधी कार्यक्रम पार पडला.

कोल्हापूर दक्षिण राष्ट्रवादीचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शरद पवार यांचे नेतृत्व दूरदर्शी आहे. सिंचनापासून फळ लागवडीच्या विस्तारापर्यंत आणि कृषीमालाच्या हमी भावापासून कर्जमाफीपर्यंत शेतकऱ्यांच्या विकासाचा विचार शरद पवार यांनीच केला. स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांसाठी ३३ टक्के जागा राखीव ठेवण्याचा क्रांतीकारी निर्णय पवार यांनीच घेतला. कला, सांस्कृतिक, क्रीडा, साहित्य अशा विविध क्षेत्रात पवार यांनी अनेकांशी ऋणानुबंध निर्माण केले. राजकारणात सर्व जाती-धर्माच्या लोकांना पदे देऊन खऱ्या अर्थाने सोशल इंजिनिअरिंग पवार यांनीच घडवले. अशा नेतृत्वाचा आदर्श घेऊन प्रगतीशील आणि सर्व समावेशक महाराष्ट्र घडविण्यासाठी प्रयत्न करूया.

या वेळी कार्यकर्त्यांना शरद पवार यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी योगदान देऊ, अशी शपथ देण्यात आली. तसेच पवार यांना दिर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना करवीर निवासिनी श्री अंबाबाई चरणी करून लाडू वाटप करण्यात आले. या प्रसंगी पीटर चौधरी, निरंजन कदम, सुरेंद्र माने, विनायक जगनाडे, सुनीता कांबरे, संपदा काळे, कल्पना रांगणेकर, दीपक कश्यप, बापू पोवार, संग्राम जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.