‘नामांतर हा त्यांचा विषय, आमचा नव्हे…’

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे विधान

0
73

नागपूर (प्रतिनिधी) : सध्या राज्यात औरंगाबाद शहराच्या नामांतराचा विषय चांगलाच तापलेला आहे. त्यावरुन महाविकासआघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये देखील मतभेद असल्याचं दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नामांतराबाबत आग्रही भूमिका घेतली असतानाही  आता राष्ट्रवादीचे बडे नेते प्रफुल्ल पटेल यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ करणे हा शिवसेनेचा विषय आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजेंड्यावरील विषय नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

पटेल यांनी आज (शनिवार) शिर्डीत येऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले की, शिवसेनेकडून अनेक वर्षांपासून औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख केला जातो. तो शिवसेनेचा विषय आहे. जेव्हा शासनाचा विषय येईल, तेव्हा तिन्ही पक्षांची समन्वय समितीत चर्चा होईल. समन्वय समितीत तिन्ही पक्षांचे दोन दोन ज्येष्ठ मंत्री आहेत. तात्विक निर्णयानंतर मंत्रीमंडळापुढे विषय ठेवण्यात येतात. त्यामुळे या विषयावर इतक्या लवकर भाष्य करणं उचित नाही. कारण नामकरणाचा विषय अद्याप समन्वय समितीकडे गेलेला नाही. पुन्हा त्यावर कॅबिनेटमध्ये चर्चा होईल. यावर घाईने भाष्य‌ करणं योग्य नाही.