समरजीत घाटगे, आम्ही गरीब जरुर, पण स्वाभिमानी आहोत : ए. वाय. पाटील

0
719

कोल्हापूर (प्रतिनिधी) : समरजीत घाटगे, तुम्ही जरूर राजे आहात, त्यामुळेच सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला आहात. मी एका सामान्य कुटुंबात जन्मलो म्हणून माझा अपमान करू नका. आम्ही गरीब असलो तरी स्वाभिमानी आहोत, अ]सा टोला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील यांनी पत्रकाद्वारे लगावला आहे.

पत्रकात पाटील यांनी पुढे म्हटले आहे की, घाटगे, तुम्ही भाजपचे जिल्हाध्यक्ष आहात व मी राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष आहे. दोन्ही पक्षांच्या विचारधारांमध्ये अंतर आहे. मी तुमच्यावर व्यक्तिगत नव्हे, राजकीय टीका केली होती. तरीसुद्धा तुम्ही दुसऱ्या वेळी टीका केली. तुमची भाषा ही कागलची आहे, कागलमधून स्क्रिप्ट येते आणि तुम्ही ते प्रसारमाध्यमांना देता, अशी टीका करता, हे योग्य नाही. मी राजकीय परंपरा नसलेल्या कुटुंबातून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आलो. पंचवीस ते तीस वर्षे प्रामाणिकपणे, निष्ठेने पक्षाचे काम करत आहे. तुमच्या कागल तालुक्यामध्ये तुम्ही आणलेल्या ग्रामपंचायतीपेक्षा कितीतरी जादा ग्रामपंचायती मी राधानगरी तालुक्यामध्ये पक्ष संघटनेच्या ताकदीवर विजयी केल्या आहेत. अनेक वर्षे पंचायत समितीवर वर्चस्व ठेवले आहे. जिल्हा परिषदेमध्ये विजय मिळवला, बँकेवर अनेक वर्षे संचालक आहे, असे असताना मी अडाणी आहे, असे मला समजता. अशी विधाने करणे योग्य नाही.

केंद्र सरकारकडून जीएसटीच्या परताव्यापोटी राज्य सरकारला अडतीस हजार कोटी येणार आहेत. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान व दोन लाखापेक्षा जास्त असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी शासन करणारच आहे. त्यामुळे आर्थिक संकट आहे. राजर्षी शाहू महाराजांचा जनक घराण्याचा वारस आहे, असे सातत्याने सांगून महाराजांच्या गादीचा अपमान तरी होत नाही ना?

दिल्लीच्या सीमांवर लाखो शेतकरी ऐंशी दिवसांपासून जास्त दिवस थंडीमध्ये कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन करीत बसले आहेत. त्यांची आठवण ठेवा, अशी अपेक्षा मी पत्रकातून व्यक्त केली. ही काय माझी चूक झाली का, याचाही जबाब द्या, असेही त्यांनी म्हटले आहे.