शाहू कारखान्याच्या बुडात असलेल्या गावांतून जनतेने तुम्हाला हद्दपार केलंय…

राष्ट्रवादीचा भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांच्यावर पलटवार  

0
174

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस पक्ष एकत्रित राहिले. आम्हाला घवघवीत यश मिळाले. उलट शाहू साखर कारखान्याच्या कारखान्याच्या बुडात असलेल्या लिंगनूर दुमाला, करनूर, वंदूर, व्हन्नुर, सिद्धनेर्ली, एकोंडी, शेंडूर, पिंपळगाव बुद्रुक, साके या गावांमधून जनतेने तुम्हाला हद्दपार केले, हे सोयीस्कररित्या विसरू नका, असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांच्यावर पत्रकाद्वारे केला आहे.

पत्रकात म्हटले आहे की, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी पत्रकाच्या माध्यमातून ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पक्षाने मिळवलेले घवघवीत यश जाहीर केले. तो संदर्भ घेऊन त्यांच्याबद्दल उध्टपणाची वक्तव्ये करणे, हे निषेधार्हच आहे. विधान परिषद निवडणुकीनंतर भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदावरून समरजीतसिंह घाटगे यांना हटवा, अशी मागणी खुद्द भाजपमधूनच झाली होती. त्यांनी दुसऱ्या पक्षांच्या जिल्हाध्यक्षावर टीकाटिप्पणी करण्याचा नैतिक अधिकार नाही.

ग्रामपंचायत निवडणुकीत कागल, गडहिंग्लज उत्तूर मतदारसंघात निवडणूक झालेल्या ६६३  जागांपैकी एकट्या राष्ट्रवादीला ३२०, शिवसेना व मित्रपक्षांना २१० जागा मिळालेल्या आहेत. समरजीत घाटगे यांचे वक्तव्य म्हणजे “पडलो तरी नाक वर” अशा पद्धतीची आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जास्त जागा निवडून आलेत हे आकड्यांनीशी प्रसिद्ध होऊनही, तुम्हाला पटणारच नसेल तर ज्या वेळी राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांचा मेळावा व सरपंच निवडी होतील,  त्या दिवशी त्यांची संख्या मोजण्यासाठी तुम्ही शाहू कारखान्याच्या उपाध्यक्षाना पाठवून द्या

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या पंचक्रोशीत काय झालं ? या प्रश्नाला उत्तर देताना या पत्रकात म्हटले आहे, एक हसूर खुर्द गाव वगळता माद्याळ, आलाबाद, बिनविरोध झालेले वडगाव, मांगनूर, बेलेवाडी मासा, तमनाकवाडा, बोळावीवाडी, करंजीवणे, लिंगनूर कापशी, गलगले, मेतके या सेनापती कापशी खोऱ्यातील गावांमध्ये राष्ट्रवादीसह महाविकास आघाडी व मित्रपक्षांची सत्ता आलेली आहे.

या पत्रकावर जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ सदस्य युवराजबापू पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक भैया माने, माजी जि. प. सदस्य वसंतराव धुरे, जि. प. सदस्य मनोजभाऊ फराकटे, जि. प. सदस्या सौ. शिल्पा शशिकांत खोत यांच्या सह्या आहेत.