मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय नौदलाचा जवान सुरज कुमार दुबे (वय २७) याचे अपहरण करून त्याला पेट्रोल टाकून जाळण्यात आले. हा धक्कादायक प्रकार पालघर येथून समोर आला आहे. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र,  शरीर जास्त भाजल्याने त्याला मुंबई येथील नेव्ही हॉस्पिटलमध्ये हालविण्यात आले होते. मात्र शनिवारी रात्री त्याचा मृत्यू झाला.

सुरज कुमार दुबे आयएनएस कोयंबटूरच्या लीडरशीप ट्रेनिंग एस्टेबलिस्मेंटमध्ये तैनात होता. ३० जानेवारीला सुट्टी संपल्यानंतर तो कामावर जाण्यासाठी कोयंबटूर येथे जात होता. तो रांचीहून हैद्राबादला पोहोचला. मात्र त्यानंतर त्याचे दोन्ही मोबाईल स्विच ऑफ होते. त्यानंतर नातेवाईकांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली होती. त्यानंतर सुरज कुमार दुबे मुंबईत जखमी अवस्थेत आढळून आला. सूरजला जाळून नाल्यात फेकून देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचे अपहरण करून हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्याने त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.