तुळजापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा शारदीय नवरात्र महोत्सव आजपासून मंगलमय वातावरणात सुरु झाला आहे. दोन वर्षांनंतर कोरोनाचे निर्बंध हटल्याने उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच्या आधी मध्यरात्री एक वाजता देवी तुळजाभवानी मंचकी निद्रा संपवून आपल्या गर्भ घरात दाखल झाली आहे. यावेळी आई तुळजाभवानीच्या मूर्तीला पंचामृताचा विधिवत महाभिषेक करण्यात आला.

पहाटे चार वाजता तुळजाभवानीची मंदिर संस्थांचे पदाधिकारी आणि मानाचे महंत तुकोजी बुवा यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. नऊ दिवसांच्या घोर निद्रेनंतर आई तुळजाभवानीचे दर्शन झाल्याने पडत्या पावसात भाविकांनी विधिवत लोटांगण घालून मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेतले. महाराष्ट्रासह शेजारील राज्यातील भाविक देखील यावेळी मोठ्या प्रमाणात तुळजापुरात दाखल झाले आहोत. ज्योत घेऊन जाण्यासाठी तरुण भक्तांनीही आई तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने आल्याच पाहायला मिळत आहे. आई तुळजाभवानीच्या मंदिरावर केलेली मनमोहक रोषणाई ही या नवरात्राचे आकर्षण ठरले आहे. नवरात्रीच्या निमित्ताने संपूर्ण तुळजापूर नगरी सजली आहे. ठिकठिकाणी रोषणाई करण्यात आली आहे.

महाराष्ट्रची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची ९ दिवसांपासून सुरु असलेली मंचकी निद्रा संपली असून पहाटे देवीची मूळ अष्टभुजा मूर्ती सिंहासनावर स्थापित करण्यात आली. शारदीय नवरात्र उत्सव आज दुपारी घटस्थापनेने सुरवात आहे. त्यापूर्वी देवीची मूर्ती विधिवत पूजा करुन पलंगावरून मूळ सिंहासनावर नेण्यात आली. देवीची मंचकी निद्रा ही वर्षातून ३ वेळेस असते.

तुळजापुरात आज पहाटेपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे भाविकांचे प्रचंड हाल झाले. प्रज्वलित केलेल्या भवानी ज्योत छत्रीचा घेऊन न्याव्या लागत आहेत. भर पावसात देखील भाविकांचा उत्साह कायम आहे. भाविकांच्या प्रचंड संख्येच्या पार्श्वभूमीवर पावसापासून संरक्षण व्हावे, यासाठी मंदिराबाहेर निवारा नाही. बंदोबस्त करणारे पोलिस देखील पावसात भिजत कर्तव्य बजावत आहेत.