धामोड (प्रतिनिधी) : दिपावली जवळ आली की सर्वच दूध संस्थांची बोनस वाटपाची लगबग सुरू होते. यावर्षी सर्वात जास्त बोनस कोणती संस्था देणार ? याकडे दूध उत्पादकांचे लक्ष लागून राहते. यंदा राधानगरी तालुक्यातील लाडवाडी येथील अण्णासाहेब शिवा नवणे या संस्थेने सर्वात जास्त बोनस देण्याची तीन वर्षांची परंपरा कायम राखली आहे.

गेली तीन वर्षे तालुक्यात सर्वात जास्त आपल्या दूध उत्पादकांना बोनस देण्यात ही संस्था यशस्वी ठरली आहे. यावर्षी संस्थेने म्हैस दूध उत्पादकांना २५ टक्के आणि गाय दूध उत्पादकांना २१ टक्के बोनस जाहीर केला आहे. त्यामुळे दूध उत्पादकांत आनंदाचे वातावरण पसरले असून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

‘लाईव्ह मराठी’शी बोलताना संस्थेचे संस्थापक चेअरमन राजाराम विठ्ठल सासमल म्हणाले की, कामगारांच्या योग्य नियोजनामुळे गोकुळच्या सर्व योजना उत्पादकांपर्यंत पोहोचत आहेत. उत्पादकांनी केलेला शुध्द दूध पुरवठा आणि त्याला संचालक मंडळाच्या योग्य नियोजनामुळे आपली संस्था तालुक्यात अव्वल असल्याचा आपल्याला अभिमान आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पोतदार, व्हा. चेअरमन संजय रेडेकर, गोकुळ दूध संघाचे वैरण विकास सुपरवायझर प्रकाश सासमल, सर्व संचालक, उत्पादक आणि कर्मचारी आदी उपस्थित होते.