कोल्हापूर (प्रतिनिधी) : आम्ही सत्तेत आल्यावर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय देण्यासाठी प्रतिलिटर दोन ते चार रुपये दरवाढ देऊ.  वासाचे दूध निघाल्यानंतर संबंधित संस्थांना योग्य तो मोबदला देऊ, असे आश्वासन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ यांनी दिले. आज (मंगळवार) गोकुळ दूध संघासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर करवीर प्रांत कार्यालयात प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते.

नवीद मुश्रीफ म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकरी, दूध उत्पादक संघामध्ये परिवर्तनाची वाट पहात आहेत. संस्थापक कै. आनंदरावजी पाटील – चुयेकर यांच्या आशीर्वादाने राजर्षी शाहू आघाडीकडून निवडणूक लढविण्यासाठी मी इच्छुक आहे. आम्ही सत्तेत आलो तर प्रतिलिटरला दोन ते चार रुपये दूध दरवाढ देऊ.  राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर गोकुळ दूध संघाचा लौकिक वाढवू. हाच आमचा जाहीरनामा असेल.

अर्ज दाखल करण्यापूर्वी नवीद मुश्रीफ यांनी सहकाऱ्यांसह लिंगनूर दुमाला येथील ग्रामदैवत श्री हनुमान, श्री क्षेत्र आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ, कागल येथील श्रीलक्ष्मी देवी, श्री गणेश व श्री गहिनीनाथ गैबीपीर या देवतांचे दर्शन घेतले.         

या वेळी गणपतराव फराकटे, भैया माने, प्रवीणसिंह पाटील, प्रकाशराव गाडेकर, शशिकांत खोत, आर. व्ही. पाटील, एम. एस. पाटील, मनोजभाऊ फराकटे, बाळासाहेब तुरंबे, वसंतराव धुरे, सतीश पाटील, कागल,  मुरगूड व  व गडहिंग्लज नगरपालिकेचे नगरसेवक व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.