मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह  वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केल्यानंतर त्यांना मंगळवारी रात्री महाड न्यायालयाने जामीनही मंजूर केला. त्यानंतर ‘ सत्यमेव जयते’  अशी दोन शब्दांत राणे यांनी ट्विट  करत आपली  प्रतिक्रिया दिली.    

राणे यांना काही अटींवर  आणि  १५  हजार रुपयांच्या  जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. त्यांना ३० ऑगस्ट आणि १३ सप्टेंबर रोजी महाड पोलीस ठाण्यात हजेरीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. त्याचबरोबर  भविष्यात  पुन्हा अशी वक्तव्ये करू नको, अशाही सूचना न्यायालयाने केल्या आहेत.

नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी मंगळवारी दुपारी  संगमेश्वरजवळ अटक केली होती. मंगळवारी उशिरा राणे यांना महाड न्यायालयात हजर केले.  त्यानंतर रात्री ११ वाजेपर्यंत यावर सुनावणी सुरू होती.  सरकारी वकील आणि राणे यांच्या वकिलांनी युक्तीवाद केल्यानंतर राणे यांना न्यायदंडाधिकारी शेखबाबासो पाटील यांनी जामीन मंजूर केला.