नारायण राणे म्हणजे ‘भोकं पडलेला फुगा’ : शिवसेना  

0
123

मुंबई  (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल  आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर मंगळवारी राज्यातील शिवसेना रस्त्यावर उतरली. त्यानंतर  राणेंची अटक आणि रात्री उशीरा त्यांना मिळालेला जामीन या नाट्यमय घडामोडीमुळे राज्याचे राजकीय  वातावरण चांगलेच तापले. या गदारोळानंतर आज (बुधवार) सामनाच्या अग्रलेखात नारायण राणे यांचा शिवसेनेने खरपूस समाचार घेतला.   

या अग्रलेखात म्हटले आहे की,  नारायण राणे हे कधीच महान किंवा कर्तबगार नव्हते. शिवसेनेत असताना त्यांचे नाव झाले ते सत्तेच्या शिड्या जलदगतीने चढता आल्यामुळेच. राणे यांनी शिवसेना सोडल्यावर त्यांचा लोकसभा आणि विधानसभेत चार वेळा शिवसेनेने दणकून पराभव केला. त्यामुळे राणे यांचे थोडक्यात वर्णन करायचेच झाले, तर भोकं पडलेला फुगा असेच करता येईल.

पंतप्रधान मोदी यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या ‘महात्मा’ नारोबा राणे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला करण्याची भाषा केली. पंतप्रधानांच्या बाबतीत कुणी असे विधान केले असते तर त्यास देशद्रोहाच्या आरोपाखाली एव्हाना तुरुंगात डांबले असते. नारोबा राणे यांचा गुन्हा त्याच प्रकारचा आहे. महाराष्ट्रात कायद्याचेच राज्य आहे आणि एका मर्यादेपलीकडे ही बेताल बादशाही खपवून घेतली जाणार नाही हे तीने दाखवून द्यायची हीच वेळ आहे.

पंतप्रधान मोदी हा बेतालपणा सहन करणार नाहीत. मुख्यमंत्र्यांवर हात टाकण्याची भाषा करणारा कोणीही असो त्यांचे हात कायदेशीर मार्गाने उखडलेलेच बरे. पंतप्रधान मोदी यांना मारण्याचा नुसता कट रचल्याच्या (?) आरोपाखाली काही विचारवंतांना फडणवीस सरकारनेच तुरुंगात सडवलेच आहे. इथे नारोबा राणे यांनी मुख्यमंत्र्यांना मारण्याची सुपारी घेतल्याचे दिसत आहे. आता सुपारीबाजांची महाराष्ट्रात आरती ओवाळायची काय? असा सवाल अग्रलेखातून करण्यात आला आहे.