नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्ताराला आता काही तासांचा अवधी उरला आहे. महाराष्ट्रातून चार जणांना मंत्रिपद मिळणार हे जवळपास निश्चित झालं आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे, खा. भागवत कराड, भारती पवार आणि कपिल पाटील यांचा समावेश आहे. सुमार कामगिरीमुळे संजय धोत्रे यांना राजीनामा द्यावा लागला आहे. विशेष म्हणजे ऐन वेळी खा. प्रीतम मुंडे यांचा पत्ता कापण्यात आला आहे. प्रीतम या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या असून घराणेशाहीचा आरोप होऊ नये, म्हणून त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश न झाल्याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आहे.

नव्या मंत्र्यांना आज सायंकाळी ६ वा. शपथ देण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी सर्व मंत्र्यांची बैठक घेतली त्यानंतर काही मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. तर काही जणांनी  शपथविधीचा निरोप देण्यात आला आहे. ओबीसी नेतृत्व कायम राखण्यासाठी प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद दिलं जाईल, अशी शक्यता होती, मात्र त्यांच्या ऐवजी मराठवाड्यातून डॉ. भागवत कराड यांना मंत्रिपद दिले जाणार हे निश्चित झाले आहे.

भागवत कराड हे वंजारी समाजाचे नेतृत्व करतात. कराड हे औरंगाबादचे माजी महापौर राहिले होते. त्यांची राज्यसभेत खासदार म्हणून निवड झाली आणि आता थेट मंत्रिपदी वर्णी लागली आहे. शिवसेनेला अंगावर घेण्यासाठी आक्रमक चेहरा म्हणून नारायण राणे यांना संधी देण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, संतोष गंगवार, सदानंद गौडा, देबोश्री चौधरी, रतनलाल कटारिया, थावरचंद गहलोत, रमेश पोखरियाल निशंक, रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे या ९ मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे.