मुंबई (प्रतिनिधी) :  राज्यातील सर्व दुकाने आणि आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेत असाव्यात असा निर्णय आज (बुधवार) पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह अन्य मंत्रीही उपस्थित होते.

या बैठकीत कामगार संख्या दहापेक्षा कमी असलेल्या आस्थापना, तसेच दहापेक्षा अधिक असलेल्या आस्थापना, अशा सर्व आस्थापना, देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करण्यात याव्यात. मालक आस्थापनेचा नामफलक हा मराठी देवनागरी लिपीबरोबरच इतर भाषेतही लिहू शकतो. मात्र, मराठी भाषेतील नामफलक प्रारंभी लिहिणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षरांचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये.

ज्या आस्थापनेत कोणत्याही प्रकारे मद्य विक्री किंवा मद्यपान सेवा दिली जात असेल अशा आस्थापनेस महापुरुष, महनीय महिला किंवा गड किल्ल्यांची नावे देण्यात येऊ नयेत असाही निर्णय घेण्यात आला.