कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे शहरात लवकरच सुरू होणाऱ्या मेट्रो रेल्वेच्या स्टेशनला लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे नाव देऊन त्यांच्या लोक कल्याणकारी कामाला केंद्र आणि राज्य सरकारने वंदन करावे, अशी प्रमुख मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशनचे  मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. ब्रिजेश दीक्षित यांना मेलद्वारे देण्यात आले. 

या निवेदनात म्हटले आहे की, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी पुणे शहरामध्ये विविध शैक्षणिक संस्थांची उभारणी करून पुण्याला विद्येचे मंदिर आणि माहेरघर करण्याचा मोलाचा वाटा उचलला. पुण्यामध्ये त्यांच्या शैक्षणिक कार्याला फार मोठे महत्त्व आहे. शाहू महाराजांच्या अनेक समाजोपयोगी कार्यांचा आणि  गोष्टींचा विचार करून पुण्यामध्ये लवकरच कार्यान्वित होणाऱ्या मेट्रो स्टेशनला लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे नाव देऊन त्यांच्या लोक कल्याणकारी कामाला केंद्र आणि राज्य सरकारने वंदन करावे.

या निवेदनात पैलवान (हिंदकेसरी) दिनानाथ सिंह, अशोक पोवार, पैलवान (महाराष्ट्र केसरी) विष्णू जोशीलकर, रमेश मोरे, पैलवान (उपमहाराष्ट्र केसरी) अमृता भोसले, भाऊ घोडके, ॲड. रणजित गावडे, माणिक मंडलिक, अजित सासने, चंद्रकांत सूर्यवंशी, पप्पू सूर्वे, चंद्रकांत पाटील, महेश जाधव, दादा लाड, विनोद डुणूंग यांच्या सह्या आहेत.