इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी शहरात बऱ्याच ठिकाणी झाडांना खिळे मारुन त्यावरती जाहिरातीचे फलक लावण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. त्यामुळे आज (गुरुवार) पैलवान अमृतमामा भोसले युवा शक्तीच्या वतीने खिळेमुक्त झाड मोहिम सुरु करण्यात आली आहे. ही मोहिम महेश सेवा समिती, मालू पेट्रोल पंप, दाते मळा परिसरात करण्यात आली.

इचलकरंजी शहरात अनेक झाडांवर जाहिरातीचे फलक लावण्याचे प्रमाण वाढू लागले आहेत. या झाडांना मोठ्या प्रमाणात खिळे मारल्यानंतर त्यांची वाढ खुंटवण्याबरोबरच आयुष्यमान कमी होते. याकडे पालिकेने  सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शहरातील सामाजिक संस्था आणि संघटना आता खिळेमुक्त झाड मोहिम राबवण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. याची सुरुवात आज पैलवान अमृतमामा भोसले युवाशक्तीने  केली. यावेळी विविध झाडांवर लावलेल्या फलकांबरोबरच खिळेही मोठ्या प्रमाणात काढण्यात आले. यातून झाडांना जीवदान देण्याबरोबरच शासनाच्या वृक्ष लागवड आणि संवर्धन मोहिमेला आणखी पाठबळ मिळत आहे.

यावेळी युवाशक्तीचे अवधूत पाटील, ऋषभ हेरलगे, अमीन पठाण, तुषार गोलंगडे, शुभम कोरे, संजय कुंभार, स्वप्नील जाधव, बबलू नदाफ यांच्यासह पदाधिकारी, सदस्य सहभागी झाले होते.