वाघापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले ज्योतिर्लिंग देवाची नागपंचमी यात्रा कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शांततेत पार पडली. आज (शुक्रवार) पहाटे ५ वाजता आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सपत्नीक व मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने पूजा व आरती करण्यात आली.

सकाळी १० वाजता टाळमृदंगाच्या गजरात नागमूर्तीची मिरवणूक काढून मंदिरात स्थानापन्न करण्यात आली. तहसीलदार अश्विनी वरुटे -अडसूळ व पोलीस उपनिरीक्षक सतीश महेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसर व गावात स्थानिक ग्रामस्थ, व्हाईट आर्मी तसेच पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

यावेळी पुरोहित विजय स्मार्त, सागर गुरव, देवस्थान समिती अध्यक्ष अरविंद जठार, उपाध्यक्ष सदाशिव दाभोळे, सरपंच जयश्री दिलीप कूरडे, उपसरपंच शुभांगी कांबळे, पोलीस पाटील दत्तात्रय घाटगे, प्रकाश जठार, आनंदा जठार, सुनील जठार, युवराज आरडे, अर्जुन दाभोळे, कृष्णात जठार, ग्रामसेवक तानाजी शिंदे, तलाठी के. एम. जरग आदी उपस्थित होते.

चांगभलंचा गजर नाहीच…

वाघापूरची नागपंचमी यात्रा म्हटले की खाद्य पदार्थांच्या मेजवानीचे स्टॉल, भाविकांच्या गर्दीने फुलून गेलेले रस्ते व भाविकांनी जोतिबाच्या नावानं चांगभलं चा केलेला जय जयकार, असे चित्र पाहावयास मिळते. मात्र, गेली दीड वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंदिर बंद ठेवावे लागत असल्याने याहीवर्षी चांगभलंचा गजर झालाच नाही.