कोल्हापूर (प्रतिनिधी) : ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनामुळं एक लढावू आणि अभ्यासपूर्ण नेतृत्व आपण गमावले आहे. एन.डी.पाटील यांनी कष्टकरी आणि अन्यायग्रस्त लोकांसाठी आपले आयुष्य वेचले. अंधश्रध्दा निर्मुलन असो किंवा परिवर्तनाची चळवळ असो, सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते आघाडीवर असायचे. त्यांच्या निधनामुळे पुरोगामी चळवळीची मोठी हानी झाल्याचे माजी खा. धनंजय महाडिक यांनी सांगितले.

धनंजय महाडिक म्हणाल की, हिंसक आंदोलनापेक्षा अभ्यासपूर्ण चर्चेच्या माध्यमातून शासनकर्त्यांना झुकवण्याची ताकद एन.डी.पाटील यांच्या विचारांमध्ये होती. कोल्हापुरातील टोलविरोधी आंदोलन, वीज दरवाढी विरोधातील आंदोलनं त्यांच्यामुळं यशस्वी झाली. सर्वसामान्य कार्यकर्त्यालाही बळ मिळेल, चळवळीची ताकद कळेल, अशी त्यांची आंदोलनाची पध्दत असायची.

त्यांच्या निधनामुळे कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीची मोठी हानी झाली आहे. सर्वसामान्य शेतकरी आणि कष्टकर्‍यांचा आधार असलेले पितामह हरपले असून त्यांना मी अंत:करणपूर्वक श्रध्दांजली अर्पण करत असल्याचे सांगितले.