‘माझे वीज बिल, माझी जबाबदारी’ : सातर्डेच्या ‘आजीबाईं’चा वेगळा आदर्श

0
134

कोल्हापूर (प्रतिनिधी)  : कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील सातर्डेच्या एका आजीबाईंनी ‘माझे वीज बिल – माझी जबाबदारी’ ही भूमिका जपली आहे. आर्थिक आधार नसतानाही ७५ वर्षाच्या आजीबाई धोंडूबाई लाड यांनी थकीत वीज बील भरून महावितरणला आधार दिला आहे. अन् थकबाकीदार वीज ग्राहकांपुढे एक आदर्श ठेवला आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या आजीबाईंचे आभार व्यक्त केले आहेत.

महावितरणकडून वीज बिलाच्या थकबाकी वसुलीसाठी मोहीम राबविण्यात येत आहे. कोरोना काळात अखंडित वीज सेवा देऊन १० महिन्याची थकबाकी असतानाही वीज पुरवठा सुरळीत ठेवून वीज बिले भरण्यासाठी विनंत्या, आवाहन केले. मात्र आता वसुलीसाठी कर्मचाऱ्यांवर नाईलाजास्तव वीजपुरवठा खंडित करण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत दिलासा देणारी बाब म्हणजे थकबाकीमुक्त असणाऱ्या सातर्डेच्या आदर्श आजीबाई व त्यांच्यासारखे वीज बिल भरणारे वीज ग्राहक यांनी आदर्श घालून दिला आहे.