तरुणांना व्यवसायाद्वारे उभारी देणे माझे कर्तव्य : घाटगे

0
22

सावर्डे बुद्रुक (प्रतिनिधी) : तरुणांनी केवळ उच्चशिक्षित होऊन नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाचाही विचार करावा. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचा वंशज म्हणून बहुजन समाजातील तरुणांना व्यवसायाद्वारे स्वतःच्या पायावर उभे करणे हे कार्य मी माझ्या कर्तव्य भावनेतून करीत आहे, असे प्रतिपादन शाहू ग्रुप प्रमुख व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले.

कुरणी, ता. कागल येथील अनिकेत शिवाजी पार्टे या तरुणाने राजे बँकेच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजनेतून गोठा प्रकल्प उभारला आहे. त्याची पाहणी घाटगे यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते.

घाटगे म्हणाले, की तरुणांना उद्योग-व्यवसाय उभारण्यासाठी राजे बॅंकेने अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून नेहमीच पुढाकार घेतला आहे. राजे बॅंकेने आजपर्यंत कर्जपुरवठा केलेले अनेक उद्योजक आपापल्या व्यवसायात यशस्वी झाले आहेत. इतर तरुणांनी देखील उद्योग-व्यवसायांमध्ये उतरावे. राजे बॅंक त्यांना आर्थिक मदत करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी माजी उपसरपंच लक्ष्मण जत्राटे, विनोद पाटील, शामराव मांगोरे, कृष्णात पाटील, भाऊसाहेब पाटील, विजय माने, सचिन पाटील, प्रवीण पाटील, अनिल हंचनाळे, तुकाराम पाटील आदी उपस्थित होते.