कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी) :  खासदार संजय मंडलिक यांनी शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात काय परिणाम होतील, याच्यापेक्षा कागलच्या राजकारणामध्ये मात्र वेगळाच रंग येणार आहे. आगामी काळात खा. मंडलिक गटाला समरजितसिंह राजे गटाशी संधान बांधावे लागेल असे चित्र असल्यामुळे विद्यमान आमदार आणि माजी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासाठी ही टेन्शन वाढविणारी गोष्ट आहे.

नुकताच खासदार मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात निश्चितच मोठे फेरबदल होणार आहेत. राजकीय विद्यापीठ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कागलमध्येही मोठे फेरफार होण्याची शक्यता आहे. यापूर्वी आ. मुश्रीफांना संजयबाबा घाटगे आणि खा. मंडलिक गटाची ताकद मिळत होती. मात्र आता खासदार मंडलिक यांनी शिंदे गटाला पाठिंबा देऊन थेट भाजपालाच पाठिंबा दिला आहे.

कागलमध्ये आमदार मुश्रीफ यांचा कट्टर विरोधक भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे आहेत. यामुळे इथून पुढे आघाडी धर्म म्हणून खासदार मंडलिकांना भाजपला जवळ करावे लागणार आहे. त्यामुळे आ. मुश्रीफ यांच्यामागून आपसूकपणेच मंडलिक गटाची ताकद कमी होताना दिसून येत आहे. दुसरीकडे गतविधानसभेत संजयबाबा घाटगे यांना शिवसेनेचे तिकिट देऊन समरजितसिंह घाटगेंची अडवणूक करण्यात आ. मुश्रीफांना यश मिळाले होते. त्यामुळे विधानसभेत त्यांचा विजय सुकर झाला. तरीही अपक्ष उभारलेल्या समरजितसिंह घाटगे यांनी लक्षवेधी लढत दिली होती. आगामी काळात या मतदारसंघात भाजपने हक्काचा उमेदवार उभा केल्यास मंडलिक गटाला पूर्ण ताकद त्यांना द्यावी लागणार आहे. अशा परिस्थितीत ही बाब येणाऱ्या काळामध्ये मुश्रीफ यांचं टेन्शन वाढविणारी मानली जात आहे.

कागलमध्ये मंडलिक, मुश्रीफ, समरजितसिंह घाटगे आणि संजयबाबा घाटगे असे चार गट आहेत. यापैकी मंडलिक, मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांच्या गटाची ताकद मोठी आहे. तर संजयबाबा घाटगे यांनी थेट मुश्रीफ यांनाच वेळोवेळी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या गटाची ताकद कमी झाल्याचे दिसून येत आहे. यामुळेच आगामी काळात आमदार मुश्रीफ यांना सावध राहून पुढील बांधणी करावी लागेल हे निश्चित..!