राजर्षी शाहू महाराजांच्या लोकसेवेचे मुश्रीफ यांच्याकडून अनुकरण…

निडसोशी मठाच्या शिवलिंगेश्वर महास्वामीजींचे गौरवोद्गार

0
101

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : राजघराण्यात जन्मूनही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी गोरगरिबांना आपलंसं केलं. लोकसेवेचे त्यांचेच अनुकरण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ करीत आहेत, असे गौरवोद्गार निडसोशी मठाचे शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांनी काढले. गडहिंग्लजच्या बेलबाग येथील श्री जडेयसिद्धेश्वर आश्रमात बसवेश्वर स्वामी यांच्या ७४ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित सप्ताह सांगता कार्यक्रमात ते बोलत होते.   

महास्वामीजी म्हणाले की, मुश्रीफ यांचे नेतृत्व गोरगरिबांची सेवा आणि विधायक कामातून उभे राहिले आहे. या पुण्याईची प्रचंड शक्ती त्यांच्या पाठीशी असल्यामुळेच ते सलग पाच वेळा विजयी झाले. गोरगरिबांप्रती असलेली कणव,  तळमळ आणि सेवेमुळे ते अजूनही खूप मोठे होतील

ना. मुश्रीफ म्हणाले की, मानवतावादावर आधारलेल्या या धर्माचा लौकिक श्री. बसवेश्वर स्वामींच्या पाठोपाठ श्री. वीरभद्र महास्वामीजी आणि चंद्रमा माताजी यांनी केलेल्या धर्मप्रसाराच्या कार्यामुळे पिढ्यानपिढ्या वाढतच जाईल. या वेळी मुश्रीफ यांनी आश्रमाच्या इमारतीच्या कामांसह परिसर सुशोभीकरण व दुरुस्तीसाठी ५० लाखांचा निधी देण्याचे अभिवचन दिले.

उपनगराध्यक्ष महेश कोरी म्हणाले की, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे विकासकामांबरोबरच गोरगरिबांसाठी केलेले सेवाकार्य प्रचंड आहे. त्यांच्यामुळेच मी राजकारणात आलो. त्यांच्या या कामामुळे भविष्यात ते मुख्यमंत्रीही होतील. या वेळी बहिरेवाडी (ता. आजरा) येथील शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांचे वडील रामचंद्र व आई सौ. कविता यांचा शिवलिंगेश्वर महास्वामीजी, श्री. महाबसव स्वामीजी, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, माजी नगराध्यक्ष किरणअण्णा कदम, डॉ. सदानंद पाटणे, डॉ. नागेश पट्टणशेट्टी, अमर चव्हाण,  बाळेशा नाईक, हारुण सय्यद, रमजान आत्तार आदी उपस्थित होते.