मुरगूड (प्रतिनिधी) : मुरगूडचे प्रा.  चंद्रकांत जाधव हे उत्कृष्ट क्रीडाशिक्षक तर आहेतच. तसेच ते हाडाचे सच्चे कार्यकर्तेही आहेत, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. ते कोजिमाशि संस्थेचे माजी अध्यक्ष प्रा. जाधव यांचा सेवानिवृत्तीनिमित्त मुरगुडमध्ये सपत्नीक सत्कारावेळी बोलत होते.

ना. मुश्रीफ म्हणाले की,  प्रा. जाधव हे क्रीडाशिक्षक झाले नसते तर चांगले मनोवैज्ञानिक झाले असते एवढा त्यांचा स्वभाव अष्टपैलू आहे. सेवानिवृत्तीच्या आयुष्यात त्यांनी सामाजिक कार्यात कार्यरत राहून समाजाला त्यांच्या कौशल्याचे योगदान द्यावे, असे प्रतिपादन केले.

माजी आ. के. पी. पाटील म्हणाले,  क्रीडाशिक्षक म्हणून त्यांचे काम गौरवास्पद आहेच. परंतु स्वतःला झोकून देऊन समाजकार्य करणारे ते सामाजिक कार्यकर्तेही असल्याचे सांगितले.

यावेळी मुरगूडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, दूधसाखर बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, दत्तामामा खराडे, सुनीलराज सूर्यवंशी, नंदकिशोर सूर्यवंशी, प्रवीणसिंह भोसले, उमेशराव भोईटे  आदी उपस्थित होते