इचलकरंजीतील युवकाच्या खुनाचा अवघ्या १८ तासांत छडा : तिघांना अटक

0
413

इचलकरंजी (प्रतिनिधी) : शहापूर येथील शुभम दीपक कुडाळकर (वय २६, रा. मंगळवार पेठ) याच्या खुनाचा छडा अवघ्या १८ तासांत लावण्यात शहापूर पोलिसांना यश आले आहे. मित्राच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या रागातून शुक्रवारी रात्री त्याचा खून केल्याची कबुली तिघा आरोपींनी दिली आहे. सूरज शामराव कुंभार (वय २७, रा. कुडचे मळा,  इचलकरंजी), संकेत उमेश म्हेत्रे (२३, रा. समर्थ मंदिराजवळ, जवाहरनगर, इचलकरंजी) व संतोष महांतेश बाडीगीर (२२,  रा. पाटील वसाहत, गल्ली नं. ३, कोरोची) अशी त्यांची नावे असून त्यांना रांगोळी (ता. हातकणंगले) येथे आज (शनिवार) अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक बी. बी. महामुनी यांनी  पत्रकार परिषदेत दिली.

महामुनी यांनी सांगितले की, संकेत म्हेतर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. शुभम कुडाळकर याचा दोन महिन्यापूर्वी विवाह झाला आहे. तो खोतवाडी (ता. हातकणंगले) येथे नोकरी करीत होता. त्याचे सूरज कुंभार याच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. याच रागातून तिघांनी त्याला शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास शहापूर येथील विनायक विद्यालयासमोर बोलावून घेतले. शुभम कामावर जातो, असे सांगून डबा घेऊन घराबाहेर पडला. विनायक विद्यालयासमोर सूरज कुंभार, संकेत म्हेत्रे व संतोष बाडीगीर त्याची वाट पहात थांबले होते. त्यांनी तिथे  मोटारसायकलवरून आलेल्या शुभमवर अचानक धारदार शस्त्राने हल्ला चढवला. त्याच्यावर सपासप २० वार करण्यात आले. यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपींनी कर्नाटक सीमेच्या दिशेने पलायन केले.

या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी त्वरित तपास सुरू केला. रक्तबंबाळ चेहर्‍यामुळे त्याची ओळख पटविण्यास दोन तास लागले. अखेर मोटारसायकलच्या नंबरवरून तो शुभम कुडाळकर असल्याचे निष्पन्न झाले. उपअधीक्षक बाबूराव महामुनी, शहापूरचे पो. नि. प्रकाश निकम व पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन पथके तयार केली. रात्री उशिरा निपाणीनजीक जत्राट येथील उसाच्या रानात आरोपी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर गावकर्‍यांच्या मदतीने पोलिसांनी शोधमोहीम राबवली. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन आरोपींनी तेथून पलायन केले.

आज पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव व त्यांच्या पथकाने तिघांनाही रांगोळी (ता. हातकणंगले) येथून ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सहा. फौजदार कोरवी, हे. कॉ. महेश कोरे, योगेश अवघडे, ज्ञानेश्वर बांगड, सिराजभाई, ढोणे, तांबे, फातले, लाटकर, शेख, भोरे, जावेद आंबेकरी यांच्या पथकाने केली.