इचलकरंजी (प्रतिनिधी) : यड्राव (ता. शिरोळ) येथे अनैतिक संबंधातून एका तरुण व्यापाऱ्याचा खून झाल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडला. प्रशांत भिकाजी भोसले (वय ३५, रा.बेघर वसाहत, यड्राव) असे त्याचे नाव असून आरोपी अजित उर्फ पिंटू आदमाने (वय ४०, रा. बेघर वसाहत, यड्राव) याने स्वतः शहापूर पोलीस ठाण्यात जाऊन खुनाची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून भरवस्तीत रस्त्यावरच झालेल्या खुनाच्या घटनेने गावात एकच खळबळ उडाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत प्रशांत भोसले याचे इचलकरंजी- जयसिंगपूर मुख्य मार्गावरील गजानन महाराज मंदिरालगत किराणा मालाचे दुकान आहे. प्रशांत व पिंटू आदमाने हे शेजारी राहतात. काही वर्षांपासून पिंटू याचे प्रशांतच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. यावरूनच या दोघांमध्ये पूर्वी वाद झाला होता. शुक्रवारी रात्री पुन्हा दोघांमधील वाद उफाळून आला. बेघर वसाहतीतील पाण्याच्या टाकीलगत त्यांच्यात बाचाबाची झाली. याचे रूपांतर झटापटीत झाले. पिंटू याने खिशातील चाकूने प्रशांतच्या छाती आणि पोटात वार केल्याने भोसकला. यामुळे रक्तबंबाळ अवस्थेत प्रशांत खाली कोसळला. त्याला त्वरित इचलकरंजीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

याची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र संशयित पिंटू आदमाने हा शहापूर पोलिसांत स्वत:हून हजर झाला आणि त्याने खुनाची कबुली दिली. पोलीस उपाधीक्षक बी. बी. महामुनी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.