कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने शाहू स्मारक भवन येथे सुरु केलेल्या पोस्ट कोविड केंद्राचे उदघाटन आज (बुधवार) महापौर निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले.

महापौर आजरेकर म्हणाल्या की, या केंद्रामध्ये कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना काही त्रास होऊ लागल्यास त्यांच्यासाठी तपासणी, उपचार आणि संदर्भ सेवा देण्याबरोबरच फिजिओथेरपी तसेच मानसिक आधारासाठी समुपदेशनाचे कामही केले जाणार आहे. या केंद्रामध्ये नागरिकांसाठी रुग्ण नोंदणी कक्ष, नर्सिंग कक्ष, औषध कक्ष, डॉक्टर कक्ष, तपासणी कक्ष आणि प्रतीक्षा कक्ष अशा सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.

आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या की, या केंद्रासाठी सर्व त्या सुविधा प्राधान्याने उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. सध्या कोरोना कमी झाला असला तरी कोरोनाचा धोका टळलेला नसल्याने नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक उपायोजनांचे काटेकोरपणे पालन करावे.

हे केंद्र रविवार वगळता आठवडयाचे सातही दिवस सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत कार्यरत राहील. दररोज दुपारी १ ते ३ यावेळात तज्ञ डॉक्टरांचा सल्ला उपलब्ध करुन दिला जाणार असल्याचे उपायुक्त निखिल मोरे यांनी सांगितले. या केंद्रामध्ये डॉक्टर्स, फिजिओथेरपी,समुपदेशन, नर्सिंग स्टाफ पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात आला आहे. पोस्ट कोव्हिड केंद्रांची मदत घेण्यसाठी नागरिकांनी ०२३१-२५४२६०१ या दुरध्वनीवरुन कोविड वॉर रुमशी संपर्क साधावा.

यावेळी उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, गटनेते राहुल चव्हाण, उपायुक्त निखिल मोरे, युवराज दबडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल माने, डॉ. रमेश जाधव, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, शाहू स्मारक भवनचे युवराज कदम आदी उपस्थित हेाते.