महापालिका कर्मचाऱ्यांना मिळणार सातव्या वेतन आयोगासह दोन दिवसात पगार…

0
130

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगासह जानेवारी महिन्यापासून प्रशासक कांदबरी बलकवडे यांनी पगार मंजूर केला. पगाराच्या धनादेशावर प्रशासक बलकवडे यांनी सही करुन याबाबतची घोषणा केल्यानंतर महापालिकेच्या चौकात कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला.

महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या जानेवारी २०२१ या महिन्याचा पगार १६ तारीख झाली तरी दिला नव्हता. प्रशासक बलकवडे यांनी सर्व विभागांना त्या-त्या विभागाच्या वसूलीचे उद्धिष्ठ दिले होते. या महिन्यात वसुलीची गती कमी झाल्याने उद्धिष्ठ पूर्ण होण्याची शक्यता कमी होणार म्हणून पगार थांबवला होता. तरीही प्रत्येक विभाग प्रमुखांनी फेब्रुवारी अखेर उद्धिष्ठ पुर्ण करण्याची हमी दिली.

तसेच १६ तारखेपर्यंत पगार न झाल्याने आज (मंगळवार) सर्व कर्मचारी सायंकाळी महापालिकेच्या चौकात जमले होते. वसुलीच्या उद्धिष्ठाबाबत प्रशासक बलवकवडे यांनी माहिती घेऊन उद्धिष्ठ पुर्ण होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्वरीत पगाराच्या धनादेशावर सही केली. हा पगार सातव्या वेतन आय़ोगासह दोन दिवसात मिळणार हे समजल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी चौकात जल्लोष केला. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय भोसले यांनी, प्रशासक बलकवडे यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.