महापलिका निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर..? : इच्छुकांचा जीव टांगणीला

0
92

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनामुळे महापालिका निवडणुका पुढे जाणार अशी अटकळ बांधली जात होती. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रशासनाच्या या मागणीला शासनाकडून मान्यता मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुका पुन्हा एकदा एक महिना पुढे जाऊ शकतात. त्यामुळे राज्यातील ज्या महापालिकांवर प्रशासक यांची नियुक्ती केलेली आहे. त्यांना ३१ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात येईल. दरम्यान, महापालिका निवडणुका लांबणीवर गेल्यास पुन्हा एकदा इच्छुकांची घालमेल वाढणार आहे.

कोरोनामुळे सर्व निवडणुका सातत्याने पुढे ढकलण्यात येत आहेत. आता महापालिका निवडणुका घेण्याची तयारी जोरदारपणे सुरु होती. येत्या १२ मार्चला मतदार यादी निश्चित करण्याचे काम पूर्णत्वास जाणार होते. पण नवी मुंबई आणि इतर ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे निवडणुका पुन्हा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी प्रशासनाकडून करण्यात आली होती.

दरम्यान, निवडणुका तोंडावर आल्याने इच्छुकांनी जोरदार तयारी केली आहे. मोठ्या प्रमाणात जनसंपर्क आणि प्रचार यांचा धडाका सुरूच आहे. गेले सहा महिने निवडणुका सातत्याने पुढे जात असल्याने इच्छुकांची मात्र घालमेल वाढली आहे. या सर्व प्रकारामुळे मात्र इच्छुकांचे आर्थिक गणित चांगलेच कोलमडून पडले आहे.